आव्हान १७,३०० फुटी फ्रेंडशिप शिखराचे... लहान मुलांसोबत..
आव्हान १७,३०० फुटी फ्रेंडशिप शिखराचे... लहान मुलांसोबत
८ सप्टेंबर,२०२१ च्या मध्यरात्री १२ वाजता आमची टीम ४२०० फुटावर नास्ता करत होती. त्या दिवशी आम्हाला उर्वरित राहिलेले १००० मीटर वरचे फ्रेंडशिप चे शिखर गाठायचे होते.८ सप्टेंबर चा तो क्षण अनुभवण्यासाठी गेले एक महिना टीम मधील सर्व आणि सोबत असलेली लहान मुले व त्यांचे पालक अतोनात मेहनत घेत होते.वय ६ ते १७ वयोगटातील मुलांना घेऊन हिमाचल प्रदेश, मनाली येथील फ्रेंडशिप पीकचा हा अनुभव.
२ तारखेला पुणे - चंदीगड आणि तिथून १३ तासाचा प्रवास करून आम्ही मनालीला पोहचलो. ४ सप्टेंबरला आम्ही धुंडीपासून फ्रेंडशिप शिखरासाठी ट्रेक सुरू केला ... आमच्या टीम सोबत मुंबईहून ६ वर्षांची हर्षिता , पुण्याहून 8 वर्षांची द्रुवी, १२-१३ वर्षांची सौम्या, जळगावरून अर्णव आणि त्याची मोठी बहीण अनन्या देखील या मोहिमेचा भाग होते. मुले लहान असल्या कारणाने केवळ मुले नाही तर पालक देखील या मुलांकरिता या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
मनाली येथील जंगलात प्रॅक्टिस ट्रेक
कोणत्याही पर्वतावरील मोहिमेकरिता उत्कृष्ठ नियोजन आणि काळाच्या पुढे जाऊन काही चांगल्या वाईट - घटनांचा अंदाज घेणे अत्यावश्यक आहे. निसर्ग आपल्याशी बोलत असतो फक्त त्याची भाषा आपल्याला समजली पाहिजे. मानवाने निसर्गावर अनेक मार्गाने मात केली आहे, पण अखेर त्याला डावलता येणे अशक्य आहे. माऊंटेनिरिंग च्या कोर्सेस मधून आलेली हि शिकावण या मोहिमेमध्ये काही निर्णय घेण्यास नक्कीच कामी आली.
बेस कॅम्प १ कडे जाताना आम्ही सर्व
योग्य मार्गदर्शक सूचना आणि योग्य ती काळजी घेऊन, आम्ही पुण्याहून आलेले ११ जण कॅम्प १ ला पोहचलो. कॅम्प १ ला पोहचण्यासाठी सकाळी हॉटेल वरून आम्ही नास्ता करून निघालो. सर्वानी पुढील ५ दिवसांचं गरजेचे सामान सोबत घेतले. पहिल्या टप्यातील ट्रेक लाउली नाला येथ पर्यंत करायचा होता. शहर सोडले होते, आता बियास नदीच्या वाहत्या प्रवाहाच्या विरुद्ध मार्गाने आम्ही वाट पकडली होई. बियास नदीचा उगम असलेली दिशा नजरेस पडत होती. पण अशा गगनभेदी पर्वतावर सर्व अगदी म्रुगजळाप्रमाणे भासत होते.
बियास नदीच्या उगमाची दिशा
बियास कुंड !
बियास नदी म्हणजे मनाली शहराला युगानुयुगे लाभलेले वरदान. मनाली हे संपूर्ण शहर,अनेक वस्त्या, हॉटेल या नदी किनारी झगमगताना दिसतात. अशा या नदी प्रवाहाच्या सानिध्यात आम्ही चालायला सुरुवात केली. सकाळी ११ च्या दरम्यान चालू झालेला हा ट्रेक सेव्हन सिस्टर पाहत, ग्लॅसिअर , खळखळत्या पाण्याचा आवाज आणि ढगांमध्ये लपाछपी खेळणाऱ्या बर्फच्छादित शिखरांची टोक न्याहाळत २ वाजता येऊन लाउली नाला येथे थांबला.
अगदी स्वप्नात असावी अशी कॅम्प साईट ! रंगीबेरंगी टेन्ट्स, बाजूने स्वच्छ वाहते बर्फाचे पाणी, हिरवेगार गवतांची कुरणे त्यात काळ्या-करड्या रंगांचे चरणारे घोडे, नजर जाईल तिकडे उंच उंच पर्वत शिखरे! सर्व अगदी रंगीत चित्राप्रमाणे होते. येथून आता पुढील साहसी अनुभवांना सुरुवात होणार होती. प्रथम अनुभव.. कॅम्प साईटला पोहचण्याकरिता आम्हाला बर्फातल्या पाण्यात पाय घालावा लागणार होता. त्या शिवाय पर्याय नव्हता. .. तू जा आधी.. तू.. मग मी.. असं करत त्या पाण्यात पाय घालताच रक्त्त गोठण्याची अनुभव सर्वानी घेतला ..
मागे सेव्हन सिस्टर चा नजारा
दुसऱ्या दिवशी वातावरणा अगदी अनुकूल होते.. पुढे साधारण १२०० मीटर उंचीवर असलेल्या लेडी लेग या ठिकाणी पोहचण्यासाठी निघालो. अंगावर येणारी चढाई आणि वाढत जाणारे उन त्यावेळी खूपच आव्हानात्मक वाटत होते. मुलं अगदी व्यवस्थित होती. पालक देखील मुलांकडे पाहून ठरलेल्या ठिकाणी पोहचण्यासाठी कसरत करीत होते. या सगळ्या परिस्थितीत सर्वांचे मनोबल सांभाळणे महत्वाचे होते आणि मला अत्यंत आनंद होत आहे कि आमच्या टीम मधील प्रत्येक लीडर्सने ही कामगिरी अत्यंत काळजीपूर्वक हाताळली होती.
कॅम्प १ वरील सकाळच्या थंड वातावरणात पॅन केक, गरम कॉफी चा आनंद घेऊन निघालेलो आम्ही दुपारी १२ दरम्यान लेडी लेग या ठिकाणी पोहचलो. शेवट्याच्या व्यक्तीचे मनोभावे स्वागत करून आम्ही त्याला गरम गरम सूप दिले. प्रत्येकाचा थकवा जायला आणि आणख एक टप्पा पार केल्याचा आनंद एका दमा सार्थकी लागण्यास त्या गरमागरम सुपने मदत केली. आम्ही जेवणांनंतर विश्रांती घेतली. त्यांनतर देखील बराच वेळ आमच्याकडे होता. पुढे आम्ही "बियास कुंड" पाहण्यासाठी प्रस्थान केले. कॅम्प साईट वरून ते ठिकाण अगदी नजरेस पडत होते. तिथे जाऊन आम्ही पर्वताच्या घळीमध्ये "बियास- मनालीची जीवनदात्री" असलेल्या नदीचे उगम स्थान म्हणजे 'बियास कुंड' पहिले. आम्ही हे कुंड अत्यंत उंचावरून पहिले. प्रत्यक्षात त्याचा घेरा बराच मोठा आहे हे तिथे लावलेल्या एका ठिपक्या प्रमाणे भासणाऱ्या टेन्ट मुळे झाली.
आमची कॉन्फरेन्स रूम आणि जेवणाचा टेन्ट
लेडी लेग म्हणजे स्वर्गसुख होत. त्या ठिकाणावरून हनुमान टिब्बा आणि पाठीमागे फ्रेंडशिप पीक नजरेस पडणे एव्हाना अपेक्षित होत. फ्रेंडशिप पीक अद्याप स्पष्टपने नजरेस आला नव्हता. काही वेळानी ऊन जाऊन वातावरणात थंडावा आला. वातावरण अगदी स्वच्छ झाले होते. ५८९०मीटर उंचीचा हनुमान टिब्बा नजरेस पडला. त्याचे सौंदर्य काय वर्णावे. त्याच्या मोहात मी पडले. त्याला पाहण्यात कधी सूर्य मावळला आणि सायंकाळ झाली समजलेच नाही. मागील बाजूस असलेल्या फ्रेंडशिप चे दर्शन अजूनही नीट झाले नव्हते.. म्हणून मन जरा अस्वस्थ होते. तो अजूनही आमच्याशी लपाछपी खेळत होता. त्या रात्री चांदण्यांनी आकाश भरून गेले होते, आकाशगंगेतून चांदण्या ओसंडून वाहत होत्या. अशा ठिकाणी असताना हा क्षण माझ्यासाठी सगळ्यात आवडता क्षण असतो, कारण त्या संपूर्ण वातावरणात मी आणि त्या लुकलुकत्या चांदण्या आम्हीच बोलत असतो, बाकी सगळं शांत.. !!माझ्या मागे ५९८२ मी उंचीच्या हनुमान टिब्बाचे दर्शन
ऍडव्हान्स कॅम्प शेवटचा टप्पा आणि तिथला सेट अप
पुढील दिवशी आम्ही आणखी ५०० मीटर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. समिट च्या दिवशी अंगातील बळ व वेळ योग्य ठिकाणी लागावे हा त्या मागचा उद्देश होता. मुळात आमच्याकडेजेवणाचे आणि दिवसांचे नियोजन योग्य होते त्यामुळे आम्हाला ते शक्य होते. सकाळी ९ वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. ११. ३० पर्यंत ऍडव्हान्स कॅम्प ला सर्व टीम आणि सहभागी पोहचले. हा टप्पा आत्ता पर्यंतचा सर्वात कठीण टप्पा होता. पालक आणि मुले गेल्या काही दिवसाच्या सरावाने चालण्यात आता पारंगत झाले होते.. त्या वातावरणात त्यांची तब्बेत योग्य साथ देत होती..हेच सर्वात आमच्या दृष्टया महत्वाचे होते. आम्ही आता ४२०० मीटर उंचीवर होतो. दुपारी २ नंतर वातावरणात जो बदल झाला तो अवर्णनीय होता. फ्रेंडशिप पीक ने आपल्या अंगावरील ढगांची चादर बाजूला केली आणि त्या शिखराचे नखशिखांत दर्शन आम्हाला झाले. त्याचा समोर हनुमान टिब्बा देखील स्पष्ट दिसत होता. शुभ्र कापूस पिजून ठेवल्याप्रमाणे सर्व ढग आमच्या खालील पट्ट्यात रचले गेले होते. हिरव्या कुराणानी त्या वातावरणाला आणखीच अप्रतिम बनवले होते. ते फारच मनोहारी दृश्य मी पाहत होते आणि त्यातच माझी तंद्री लागली.मनोज, मी आणि तुषार दिघे मोहिमेचे लीडर
त्याच रात्री आम्ही क्रॅम्पॉन , शूज, सर्व प्रकारचे जॅकेटचे, वाटेत लागणारे पदार्थ, सुरक्षा उपकरणे आणि पाणी घेऊन आम्ही समिट साठी सज्ज झालो. लहान मुले देखील त्या मध्यरात्री बर्फाच्या त्या फ्रेंडशिप पीककडे जाण्यासाठी उत्सुक होती .. पालकांनी मात्र बेस कॅम्पमध्ये राहण्याचानिर्णय घेतला. आता मोठी जबाबदारी आमच्यावर होती ती म्हणजे मुलांची सुरक्षितता. मध्यरात्री १. ०० वाजता आम्ही शिखराच्या दिशेने चढायला सुरुवात केली. १००० मीटर उंची गाठणे म्हणजे साधारण १५ तासाचा प्रवास. (जरास कठीण वाटत ऐकायला,बर्फाची संपूर्ण चढण असल्याने तासाला १२५-१५० मी उंची पर्यंतच प्रवास होतो). घसरड्या बर्फावर चालत आणि बर्फाचे डोंगर पार करत हा प्रवास पूर्ण करायचा होता. आम्हाला 4 पर्यंत स्वच्छ हवामानामुले व्ययस्थित चालता आले. मधे ४४००, ४५००, ४७०० इतक्या उंचीनवरून रात्रीच्या बर्फामधील गारव्याने आणि शाररिक त्रासामुळे ४ मुले ऍडव्हान्स कॅम्प ला परतली. हि सर्व मुले ज्या उंची पर्यंत, ज्या खडतर वातावरणात चढत आली होती ते अत्यंत कौतुकास्पद होत.
सर्वांत उंच त्रिकोणी आकाराचा मात्र चढाईस घाम काढणारा फ्रेंडशिप पीक आणि लहान मुलांचे पालक यांसोबत मी.
सगळे सुरक्षित होते जे आमच्यासाठी जास्त महत्वाचं होत.
मध्यरात्री १५७५० फूट उंचीवर ध्रुवीसह
पणे पुढील दोन दिवसात आम्ही सुखरूप मनालीमध्ये पोहचलो. सहभागी झालेल्या सर्वांसाठीच हा आयुष्यातील पहिला ट्रेक होता. त्या आठवणींमध्ये आणि फोटो मध्ये रममाण होऊन आम्ही तो क्षण जगलो आणि त्या सर्व क्षणांचा आनंदोस्तव साजरा केला.
आनंदाची बाब म्हणजे कोणाही मुलाला एक्सटेर्नल ऑक्सिजन लावायची वेळ आली नाही किंवा शाररिक व्याधी देखील उद्भवली नाही. उंच ठिकाणी उलटी होणे ,मळमळणे आणि भूक मंदावणे हि सामान्य लक्षणे दिसून येतात मात्र,योग्य पद्धतीने, आरामाने आणि सर्वात अत्यंत महत्वाचे म्हणजे भरपूर पाणी पिणे यांमुळे हे सर्व विकारांवर मत करता येते.
Expedition designed and organized by SL Adventure Sports, Leader Mountaineer Lahu Ughade
Leaders on expedition Manoj Wangad Snehal Ghube Gherade, Tushar Dattatray Dighe 


Comments
Post a Comment